“उद्धवजी पंढरपूर मध्ये तुम्ही चुकलातच” शिवसैनिकाचा व्हायरल लेख.

मराठी लेख

“उद्धवजी पंढरपूर मध्ये तुम्ही चुकलातच.” शिवसैनिकाचा व्हायरल लेख…

काल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंढरपूर मध्ये विठ्ठल मंदिरात सपत्नीक शासकीय महापूजा केली. या पुजेमूळे काल दिवसभर संपूर्ण राज्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचीच चर्चा होती. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळून बसने पंढरपूरला आणण्यात आलेल्या पालखीपासून ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वत: ८ ते ९ तास मुंबई ते पंढरपूर गाडी चालवत येणं या सर्व गोष्टींविषयी राज्यभरात चर्चा झाली.

राज्यातील विरोधी पक्ष असलेल्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी सोशल मीडिया वर छोटे-मोठे विषय घेऊन मुख्यमंत्र्यांना लक्ष करण्याचा प्रयत्न केला. त्याला उत्तर म्हणून एका शिवसैनिकाने फेसबुक वर एक उपरोधिक पोस्ट टाकली आहे जी सोशल मीडिया वर तुफान व्हायरल गेली आहे.

शिवसैनिकाची फेसबुक पोस्ट :-

” एकादशी दिवशी पंढरपूरला हेलिकॉप्टर ऐवजी गाडीने गेलात..गाडीला ड्रायव्हर न घेता स्वतः गाडी चालवत गेलात..पंढरपुरात मंदिराशेजारी फ्रेश होण्यासाठी,मेक अप करण्यासाठी Vanity Van न्यायला विसरलात..कमीत कमी चार दोन मेकअप वाले,ब्युटी पार्लर वाले तरी घेऊन जायचं होते पण ते ही तुम्ही केलं नाही.. या आधीच्या मुख्यमंत्र्यांसारखं राजबिंडे दिसण्यासाठी नवीन कपडे,त्यावर उठून दिसणारं जॅकेट घालायचे सोडून हे काय साधा सदरा घालून गेलात..(तो ही हिंदू धर्माचं प्रतीक असलेल्या भगव्या रंगाचा)..
तर रश्मी ताई तुम्ही ही नवी कोरी पैठणी,शालू, कासटा ऐवजी साधी सहावारी साडी परिधान करून गेलात..सोबत पर्स, मेकअप किट सांभाळायला असिस्टंट नाही घेतली.. आता पार्लर सुरू झालेत तरी साधं आय ब्रो, फेशियल ही करून गेला नाही..कमीत कमी लिपस्टिक तरी लावायची होती..केसांची बट सोडायला तर विसरलातच उद्धवजी तुम्ही तरी सुचवायचं होते..

आधीच्या मुख्यमंत्र्यांच्या जोड्यांचा थोडा तरी आदर्श घ्यायचा होता..विठ्ठलाच्या गळ्यात असतो तसा तुळशीहार ही तुम्ही घातला नाही.. तुम्ही फोटु वाले असूनही फोटो काढताना रुबाबात,तोऱ्यात उभे न राहता साधेपणाने हात जोडून उभे राहिलात.. फ्रेम मध्ये एकमेकाला खेटून उभे न राहता,पांडुरंगाला दोघांच्या मध्ये स्थान दिले..वारकरी दाम्पत्याचा सन्मान म्हणून वाकून नमस्कार करण्याऐवजी फक्त एक वरवरची,उसनी स्माईल दिली असती तरी ते धन्य झाले असते..तुम्ही मंदिरात जाताना पुजाऱ्यांकडून औक्षण करून,नाम ओढून घेतलाच नाही..रश्मीताई तुम्हीही फक्त लहान टिक्का न लावता, लग्न समारंभातील वरमाई सारखा मळवट भरायला किंवा बंदा रुपया सारखं कुंकू लावायला पाहिजे होते..फोटो काढताना एखाद्या मॉडेल किंवा सेलिब्रिटी प्रमाणे पोझ द्यायला पाहिजे होती..पुजेचाही इव्हेंट करायला तुम्हाला जमलंच नाही..

एकीकडे राज्य,जनता मोठ्या संकटात असली,तरी दुसरीकडे तुम्ही इतर राजकारणी, सेलिब्रिटी प्रमाणे आनंदी,उत्साही,तेजस्वी दिसायला पाहिजे होते..पण तुमच्या चेहऱ्यावर तर एखाद्या कुटुंब प्रमुखाप्रमाणे जबाबदारी आणि परिस्थितीचे भाव दिसत होते..लाखो वारकरी पांडुरंगाच्या दर्शनासाठी आले नाहीत याची चिंता दिसत होती..
तुमच्या या साधेपणावर जनता नाराज झालीय..त्यामुळं काहीजण जुण्या मुख्यमंत्री जोडप्यांशी तुमची तुलना करीत आहेत..

आणि हो जनतेला सवय नाही हो असा साधा,धीरगंभीर, सुसंस्कृत,ज्येष्ठ लोकांपुढे नतमस्तक होणारा,स्वतः गाडी चालवणारा,प्रत्येक बारीक सारीक गोष्ट जनतेला समजावून सांगणारा,परिस्थितीचे भान ठेवून वागणारा मुख्यमंत्री बघण्याची..तेव्हा इथून पुढे तरी समाजात वावरताना काळजी घ्या ! “