शरद पवार यांनी ‘मातोश्री’ भेटीविषयी केलं मोठं वक्तव्य..

बातम्या

शरद पवार यांनी ‘मातोश्री’ भेटीविषयी केलं मोठं वक्तव्य..

भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वर टिका केली होती.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार स्वत: बैठकीसाठी मातोश्री वर जातात पण तरीसुद्धा मुख्यमंत्री घराबाहेर पडायला तयार नाहीत असं चंद्रकांत पाटील म्हणाले होते त्याला आज शरद पवार यांनी सणसणीत प्रत्युत्तर दिले आहे.

चंद्रकांत पाटलांना उत्तर देताना शरद पवार यांनी “मला मातोश्रीवर जाण्यात कसलाही कमीपणा वाटत नाही” असं वक्तव्य केलं आहे.

तसेच विरोधक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वर घरात बसून कारभार हाकण्याच्या मुद्द्यावरून टिका करत असताना शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची पाठराखण करत त्यांची बाजू उचलून धरली आहे.

शरद पवार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विषयी बोलताना म्हणाले की, “अनेक लोक कोरोनाच्या काळात घराबाहेर पडत नाहीत हे खरं आहे पण जर महत्त्वाचे लोक जर बाहेर पडले तर अनेक लोक जमा होतात.

त्यामुळे या गर्दीमुळे कोरोनाचा संसर्ग वाढण्याची शक्यता निर्माण होते. आज टेक्नॉलॉजी खुप पुढे गेली आहे. राज्यातील कुठल्याही घटकांशी बैठक किंवा संवाद करायचा असेल तर आज संवादासाठी अनेक साधनं उपलब्ध आहेत.

त्यामुळे बैठक घेण्यासाठी किंवा संवाद साधण्यासाठी घराबाहेर पडावेच असं नाही. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोरोना बाबतीत दिवसाला १५-१५ बैठका ऑनलाईन स्वरूपात घेत आहेत हे ही सांगायला शरद पवार विसरले नाहीत.

तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं काम निष्क्रिय आहे अशी टिका देखील भारतीय जनता पक्षाने केली होती त्यास उत्तर देताना शरद पवारांनी विरोधकांना चांगलेच खडेबोल सुनावले.

मुख्यमंत्री झाल्यापासूनच उद्धव ठाकरे यांनी घेतलेले निर्णय बघता त्यांनी राज्याला गती देण्याचं काम केलं होतं मात्र कोरोनाचं संकट उभं राहिल्याने मुख्यमंत्र्यांच्या कामाला ब्रेक लागला आहे असं शरद पवार म्हणाले.

सध्या राज्य सरकार खंबीरपणे कोरोनाशी दोन हात करत आहे. आज सर्व यंत्रणा कोरोनासाठी झोकून कामाला लागली आहे.

अशा परिस्थितीत विरोधकांनी राजकीय विचार डोक्यात ठेवून मुख्यमंत्र्यांवर टिका करणं चुकीचं असल्याचंही शरद पवारांनी म्हटलं आहे.