कसलं संघ शक्ती युगे युगे म्हणताय..? संघाच्या जुन्या स्वयंसेवकाचा लेख व्हायरल..

मराठी लेख

कसलं संघ शक्ती युगे युगे म्हणताय..? संघाच्या जुन्या स्वयंसेवकाचा लेख व्हायरल..

हल्ली धारावीतला कोरोना RSS मुळेच हटला या भाजपच्या नेत्यांचा वक्तव्यांचा, तशा बातम्या पेरणाऱ्या माध्यमांचा आणि त्यांची ‘री’ ओढणाऱ्या भक्ताडांचा समाचार घ्यावासा वाटतो. काय संबंध आहे तिथं RSS चा.. तिथं त्यांना कुणी बोलावलं होतं का ? सरकारने, पालिकेने की अजून कोणी. मुंबईत महापालिका त्यांचा आरोग्य विभाग, सारे स्वच्छतादूत, याशिवाय पोलीस यंत्रणा, संपूर्ण शासकीय यंत्रणा राबत असतांना त्यांच्या यशाचे श्रेय आगाऊपणाने घेणं म्हणजे अतीच झालं. बरं असतील गेले तिथं ते, पण त्यांच्यासारखे कित्येक जण या कार्यात स्वयंस्फूर्तीने कार्यरत होते. त्यांनी याचा दिखाऊपणा केला नाही की प्रदर्शन केलं नाही. गरजच वाटत नाही तशी कोणाला !!

RSS च्या नियंत्रणाखालील भाजप पक्ष जो राज्यात आज विरोधी बाकावर आहे. त्यांनी धारावीतले यश फक्त आणि फक्त RSS चे आहे असं सांगणं म्हणजे अतिशयोक्ती आहे. त्यांचं हे सांगणं म्हणजे तिथं जीवावर उदार होऊन दिवस रात्र राबणाऱ्या डॉक्टर, आरोग्य कर्मचारी, स्वच्छता कर्मचारी, पोलीस तसेच महापालिका, सरकार यांच्या मेहनतीवर पाणी फेरण्यासारखं आहे. त्या सर्वांच्या यशात हात धुवून घेण्यासारखं आहे. धारावीतल्या या अतिशय मोठ्या मोहिमेत काही कोरोना वारीयर्सने जीव गमावलेत. काही बाधित झाले. या 800 RSS स्वयंसेवकापैकी किती बाधीत झाले, किती जीवाला मुकले कळेल का ? RSS कडून खरंच असं काम झालं असेल तर त्यांचं कौतुक केलं पाहिजे पण ते करताना दुसऱ्यांना दुर्लक्षून उद्दामपणा केला जात असेल तर त्याची चिरफाड झाली पाहिजे.

धारावीतले कोरोना निर्मूलनाचे यश आमचंच आहे सांगणाऱ्यांना सांगतोय उगाच बैलगाडीखालच्या कुत्र्यागत वागू नका. त्या कुत्र्यालाही हेच वाटतं माझ्यामुळेच बैलगाडी ओढली जातेय.

खरंतर कोणत्याही संस्था अथवा व्यक्तींना अशी मदत करताना संबंधित विभागांची परवानगी घ्यावी लागते. ती दिलीच जात नाही म्हणा. उद्या कमी जास्त बरं वाईट झाल्यावर त्याचं खापर फोडायला मागेपुढं न बघणारे आणि राजकीय भांडवल करणारेही कमी नसतात.

माझंच स्वतःचेच उदाहरण देतो. मार्च महिन्यात मी आमच्या उरण तालुक्यातील (जिल्हा रायगड) तहसीलदारांना प्रत्यक्ष भेटून विंनती केली की आम्हांला कोरोना बाबतीत जनजागृती करणे, लाउडस्पीकरद्वारे आवाहन करणं यासाठी परवानगी द्या. हे सर्व आम्ही आमचं स्वतःचं वाहन वापरून विनामूल्य करणार आहोत पण त्यांनी आमच्या आर्जवाचे कौतुक करून त्यास प्रामाणिक नकार दिला. जवळपास तालुक्यातील 40 हुन अधिक तरुणांची जे उत्स्फूर्तपणे स्वयंसेवक म्हणून काम करण्यास तयार आहेत त्यांची यादी तहसिलदार कार्यालयाला सादर केली. मात्र तहसीलदारांनी सांगितले आपल्याकडे पुरेशी यंत्रणा आहे ज्याद्वारे कोरोना मोहीम चांगल्या पद्धतीने सुरू आहे. अगदीच गरज भासल्यास आपल्या विनंतीबद्दल जिल्हाधिकाऱ्यांशी बोलून आपल्याला कळवण्यात येईल. त्यात त्यांनी हेही सांगितले या स्वयंसेवी संस्था, त्यांचे स्वयंसेवक यांचेवर नियंत्रण राखणे, त्यांचे आरोग्याची संपूर्णतः काळजी घेणे आणि त्यात कमीजास्त झाल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार याची स्पष्टता नसल्याने सध्यातरी आपली विनंती आमचेकडे राखून ठेवतो काही आदेश आल्यास आपल्याला कळवतो. यानंतरही सातत्याने तहसीलदार कार्यालयाशी आरोग्य विभागाशी संपर्क राहिला आहे आणि कदाचित तशी आवश्यकता न वाटल्याने आमच्या विनंती आर्जवाचा विचार झाला नाही.

सगळंच RSS करतंय आणि भक्ताड त्यांची इतकी ताणताहेत आणि संघशक्ती युगे युगे म्हणताहेत तर काश्मिरात हिंदूपंडितांच्या हिंदूं समुदायाच्या हत्या का घडल्या, त्यांचं विस्थापन का थांबवता आलं नाही. केंद्रात त्यांच्या विचारांचे सरकारही आहे जे काश्मीर मधून इतरत्र विस्थापित झाले त्यांचे पुन्हा तिथं पुनर्वसन का केलं जात नाही. ईशान्य भारतात मोठ्या प्रमाणात धर्मांतरे का घडली. आजही अनेकठिकाणी गोवंश हत्या होत आहेत कोण थांबवणार. मला तुम्हांला सांगायचंय RSS शी संबंध नसलेलेही कित्येक संस्था व्यक्ती अशी काम करताहेत जी स्वतःला मिरवत नाहीतच. आम्ही वाड्यावस्त्यांवर कुणी ख्रिश्चन धर्मप्रसारक आले तर मारून पिटाळून लावतो. कारण त्याचं काम धर्मांतर घडवून आणणे हेच असतं. जो जातीवंत हिंदुत्ववादी असतो तो अशा गोष्टींना विरोध करतोच..

आमच्या उरण तालुक्यात गुरे चोरणारी टोळी कार्यरत आहे. सलग दोन दिवस एक टोळी गुरे उचलून नेते. अगदी उरण शहरातून ! इथं याच तथाकथित पक्षाचा लोकप्रतिनिधी आहे आणि काही जुने आणि काही नवे जे स्वतःला RSS चे जाबांज कार्यकर्ते समजतात तेही आहेत. त्यांना माझं खुलं आवाहन आहे मी तयार आहे या टोळीला पकडण्यासाठी तुम्ही कधी येताय ते सांगा. उरण शहरात इतके CCTV कॅमेरे असताना या गुरे चोरणाऱ्या टोळीची गाडी ट्रेस होत नाही म्हणजे आश्चर्यच आहे.

मी पूर्वाश्रमीचा RSS चा कार्यकर्ता !! RSS च्या प्रचारकांचे माझ्याघरी निवास भोजनाची व्यवस्था असे. बालसंस्कार शिबिरे आणि संघाने दिलेले प्रत्येक उपक्रम राबवलेले आहेत. मात्र यांचा अजेंडा सेवाकार्ये ही फक्त भाजपसाठी तिच्या राजकारणासाठीच असतात. त्यात सेवाभाव कमी आणि राजकारण अधिक म्हणून काही वर्षांपूर्वी RSS चं काम बंद केलं.

त्यामुळे नव्या RSS च्या चोंग्याना माझं सांगणं आहे उगाच उडू नका आणि दुसऱ्यांच्या मेहनतीतून मिळालेल्या यशात हात धुवून घेऊ नका. तिकडं पुण्यात, नवी मुंबईत, पनवेल , कल्याण डोंबिवलीत, नागपुरात, अहमदनगरात, पिंपरी चिंचवड मध्ये कोरोना फैलाव होत असताना तिथंही RSS काय करते तेही सांगा. RSS दिसत नसेल तर सुट्टीवर गेलीय तेही बघा जरा !!

  • रुपेश पाटील.