बाबासाहेबांच्या ‘राजगृह’ वास्तुच्या तोडफोडीनंतर ठाकरे सरकारने घेतला ‘हा’ मोठा निर्णय..

बातम्या

बाबासाहेबांच्या ‘राजगृह’ वास्तुच्या तोडफोडीनंतर ठाकरे सरकारने घेतला ‘हा’ मोठा निर्णय..

भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुंबईतील दादर भागात असलेल्या ‘राजगृह’ या निवासस्थानावर काल रात्रीतून काही समाजकंटकांनी दगडफेक केली.

बाबासाहेबांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या वास्तुवर दगडफेक करून तोडफोड केल्याने राज्यभरात संतापाची लाट उसळली असून सर्व क्षेत्रातील व्यक्तींनी या गोष्टीचा तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला आहे.

या घटनेनंतर आज झालेल्या राज्य सरकारच्या मंत्रीमंडळ बैठकीत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या ‘राजगृह’ निवासस्थानाला इथून पुढे

१२ महीने कायम पोलिस संरक्षण ठेवण्यात येणार आहे असा मोठा निर्णय ठाकरे सरकारच्या मंत्रीमंडळाने घेतला आहे. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ही माहिती दिली.

राजगृह ही वास्तू बाबासाहेबांनी फक्त आणि फक्त पुस्तकांसाठी उभी केली. हजारो पुस्तकांचं भंडार असलेली ही वास्तु असुन बाबासाहेबांच्या अफाट बुद्धिमतेचं आणि अभ्यासाचं प्रतीक आहे.

अशा वास्तुची अवहेलना करण्याचं काम करण्यात आल्याने राज्यभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या असुन त्या समाजकंटकांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी जोर धरू लागली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून ट्वीट करून मुख्यमंत्र्यांनी जाहीर निषेध व्यक्त केला आहे.

“राजगृहाच्या आवारात घुसून काही गुंडांनी धुडगूस घातला हे धक्कादायक आहे. ही वास्तू फक्त आंबेडकरी जनतेची नाही तर संपूर्ण समाजाचे श्रद्धास्थान आहे.

आपला ग्रंथखजीना डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी या वास्तुत जपून ठेवला. महाराष्ट्रातील तमाम जनतेचे हे तीर्थक्षेत्रच आहे. राजगृहाचा अवमान करणाऱ्यांची सरकार गय करणार नाही.

कडक कारवाईचे आदेश मी पोलीसांना दिले आहेत.”
अशा आशयाचे ट्वीट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे.